निवडणूक आयोगावर संजय राऊतांचा हल्लाबोल

Foto
मुंबई : प्रचाराची मुदत संपल्यानंतरही निवडणूक आयोगाने उद्या (१५ जानेवारी) मतदान असतानाही थेट आज (१४ जानेवारी) रात्री दहा वाजेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी मुभा दिल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून विरोधी पक्षांमध्ये आक्रोश केला जात आहे. सत्ताधार्‍यांवर राजरोस पैसे वाटपाचा आरोप होत असतानाच सत्ताधार्‍यांचे कार्यकर्तेच पैसे वाटपावरून एकमेकांना पकडून बेदम चोप देत असतानाच आता निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय दिल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
 
राऊत यांनी निवडणूक आयोगानं आज सत्ताधार्‍यांना तिळगुळ दिल्याचा हल्लाबोल केला. ते म्हणाले की प्रचाराची मुदत संपूनही आधीचा नियम मोडून त्यांनी सत्ताधार्‍यांना वेगळा तिळगुळ दिलाय का? अशी शंका असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी सांगितले की पैसे वाटप करणार्‍यांना बदडले जात आहे. आज दिवसभर सुद्धा हा बदडण्याचा कार्यक्रम होईल. भाजपला आणि शिंदे सेनेला हिंदू मुसलमान केल्याशिवाय आणि पैशाशिवाय निवडणूक जिंकू शकत नसल्याचे ते म्हणाले. 
 
ठाकरे बंधूंनी दिला दिसेल तिथे ठोकण्याचा आदेश

त्यांनी पुढे सांगितले की सत्तेचा गैरवापर केल्याशिवाय ते लोक निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी दिसेल तिथे ठोकण्याचा आदेश दोघांनी दिला असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की लक्ष्मी दर्शनासाठी आजचा दिवस निवडणूक आयोगाने दान दिला आहे. दरम्यान, सिंचन घोटाळ्याचे पुन्हा एकदा वादळ घोंघावू लागलं आहे. अजित पवार यांनी युती सरकारवर बॉम्ब फोडल्यानंतर आता संजय राऊत यांनी सुद्धा अजित पवारांनी कोड्याची भाषा न वापरता थेट नाव घ्यावीत असं आव्हान दिलं. ते म्हणाले की जे काही सांगायचं तुम्ही उघडपणे सांगा, कोड्याची भाषा वापरू नका. जर अशा पद्धतीने कोड्याची भाषा होणार असेल तर हे एक प्रकारे ब्लॅकमेलिंग असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. गणेश नाईक शिंदे कोणत्या कारणासाठी जेलमध्ये जातील हे सांगावं अशीही मागणी त्यांनी केली.